बास्केटबॉल लीगच्या तिसर्‍या हंगामाची घोषणा

14 व 16 वर्षाखालील खेळाडूंचा लिलाव

। पुणे । प्रतिनिधी ।

एबीसी स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमीने ‘बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या’ सहकार्याने आयोजित करण्यात येणार्‍या एबीसी बास्केटबॉल लीगच्या तिसर्‍या हंगामाची मंगळवारी (दि.23) अधिकृत घोषणा करण्यात आली. याच बरोबर भारतात प्रथमच बास्केटबॉल खेळणार्‍या 14 व 16 वर्षाखालील खेळाडूंचा या लीग स्पर्धेसाठी लिलाव पार पडला आहे.

ही बास्केटबॉल स्पर्धा 14 व 16 वर्षाखालील मुलांसाठी भारतातील एकमेव व्यावसायिक लीग स्पर्धा आहे. या हंगामाची सुरुवात खेळाडूंच्या लिलावाने झाली ज्यामध्ये सर्व संघानी महाराष्ट्रातले तसेच देशभरातील खेळाडूंवर बोली लावली होती. या युवा खेळाडूंना त्यांचे बास्केटबॉलमधील कौशल्य दाखवण्याची आणि भारतीय बास्केटबॉलचे भविष्यातील स्टार बनण्याची संधी देणे हा या लीगचा मुख्य उद्देश आहे. पुण्यातील खराडी स्टेडियममध्ये 17 ते 23 ऑगस्ट या कालावधीत लीगचे सामने होणार असून, लीगमध्ये 60 सामने होणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी अंतिम फेरीसह या लीगचा समारोप होणार आहे. या वर्षीच्या लीगमध्य पुुणे, मुंबई, नाशिक, आणि कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून 240 मुलं व मुली खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच, 14 आणि 16 वर्षांखालील गटांमधील खेळाडूचे आयपीएलच्या समान स्वरूपानुसार 18 संघांचा सहभाग असून विजयी बक्षीस रक्कम प्रत्येक श्रेणीसाठी 1 लाख रु. असणार आहे. उच्चस्तरीय स्पर्धेची हमी देऊन हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित केले जाणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे.

सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू
14 वर्षाखालील
वैष्णवी परदेशी (चितळे वॉरिअर्स) 12.75 लाख व्हर्चुअल पॉइंट्स
सिया भोसले (त्रिनिता हिट्स) 12.75 लाख व्हर्चुअल पॉइंट्स
आर्यन प्रजापती (सुपरनोव्हा स्टार्स) 10.5 लाख व्हर्चुअल पॉइंट्स
16 वर्षाखालील
रेवा कुलकर्णी (द स्ट्रोम गर्ल्स) 11 लाख व्हर्चुअल पॉइंट्स
आदित्य पवार (बिस्ट बॉलर्स) 7.25 लाख व्हर्चुअल पॉइंट्स
Exit mobile version