काहींचा भ्रमनिरास, काहींना लॉटरी
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होताच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामुळे आता स्थानिक राजकारण ढवळून निघणार आहे. कोणत्या प्रभागात कोणत्या वर्गासाठी जागा राखीव ठरल्या, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आता आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची लगीनघाई सुरू होणार आहे. महिलांसाठी 50 टक्के आरक्षणासोबतच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीसांसाठी राखीव जागांचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, आरक्षणामुळे काहींचा भ्रमनिरास झाला असून, काहींना अचानक लॉटरी लागली आहे.
राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 2 डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे राज्यात ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. असे असताना महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. अंबरनाथ, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, भिवंडी, मुंबई, चंद्रपूर, धुळे, वसई विरार, जालना, नांदेड, मालेगाव, इचलकरंजी, जळगाव, कल्याण, कोल्हापूर, लातूर, मिरा भाईंदर, नागपूर, नवी मुंबई, पनवेल, परभणी, पिंपरी चिंचवड, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, वसई विरार महानगरपालिकेसह पालघरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
मुंबई : 227
नवी मुंबई : 111
पनवेल : 78
ठाणे : 131 जागा
पुणे :165
कल्याण-डोंबिवली : 122
वसई-विरार :115 जागा
जालना : 65 जागा
पिंपरी चिंचवड : 128
मालेगाव : 84 जागा
नांदेड : 81 जागा
छत्रपती संभाजीनगर : 115
चंद्रपूर : 66
नागपूर : 151
नाशिक : 122
कोल्हापूर : 103
सोलापूर :122
