। नवी मुंबई । वार्ताहर ।
महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली. प्रशासनाने पारदर्शीपणे प्रक्रिया राबविल्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकार्यांना समाधान व्यक्त केले. प्रत्येक प्रभागात किमान एक सर्वसाधारण जागा असल्यामुळे अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आरक्षण सोडतीप्रमाणे 41 पैकी 20 प्रभागांत प्रत्येकी दोन महिला सदस्य असणार आहेत. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली. सोडत सर्वांना पाहता यावी यासाठी नाट्यगृ हात व बाहेरही एलईडी स्क्रीन बसविल्या होत्या. आरक्षणसूचीचा फलकही बाहेर लावला होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या आरक्षण सोडतीविषयी अनेक पक्षांमधील पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे प्रशासनाने आरक्षण प्रक्रिया निष्पक्षपणे राबविण्यासाठी पुरेपूर तयारी केली होती. नाट्यगृहात अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठीच्या 6 जागा व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठीच्या 14 जागांची सोडत काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हातून चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
एक सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये आरक्षणाचा फटका विद्यमान नगरसेवकाला बसत असतो. यावेळी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे. 41 पैकी 40 प्रभाग तीन सदस्यीय व 1 प्रभाग दोन सदस्यांचा केला आहे. महिलांसाठी 61 जागा आरक्षित केल्या. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील 12 पैकी 6 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी दोनपैकी 1 जागा महिलांसाठी असून सर्वसाधारण जागांपैकी 54 जागा महिलांसाठी असणार आहेत. 20प्रभागांत तीनपैकी 2 सदस्य महिला असणार आहेत.
एकूण जागांचा तपशील
अनुसूचित जाती एकूण जागा 11, महिलांसाठी आरक्षित 6
अनुसूचित जमाती एकूण जागा 2, महिलांसाठी आरक्षित 1
सर्वसाधारण एकूण जागा 109, महिलांसाठी आरक्षित 54