| माणगाव | प्रतिनिधी |
उसर खुर्द येथील छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित अभिनव ज्ञान मंदिर विद्यालयात दि.2 व 3 डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव 2025-26 उत्साहात पार पडला. मंगळवारी (दि.2) सकाळी साडेआठ वाजता क्रीडा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रीय आईस हॉकी खेळाडू तनय उतेकर व विद्यालयाचे माजी विद्यार्थी केतन वाजे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन करून करण्यात आले. क्रीडा विभागप्रमुख विनोद लाड यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी प्रमुख पाहुणे केतन वाजे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देत 1999-2000 च्या काळातील शाळा व आजच्या शाळेतील सकारात्मक बदलांची प्रशंसा केली. तसेच, सर्व शिक्षकांच्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले. शालेय समितीचे निमंत्रित सदस्य नटी गुरुजी उपस्थित होते. खेळाडू तनय उतेकर यांनीही विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सुर्वे यांनी प्रतिकूल परिस्थितीला हरवून नाव कमावणाऱ्या सावरपाडा एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या सविता राऊत व कविता राऊत यांच्या प्रेरणादायी कथा सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम खिलाडूवृत्ती दाखवून सहभाग नोंदवला.
त्यानंरत बुधवारी (दि.3) दुपारी दोन वाजता प्रमुख अतिथी लक्ष्मण तांबे व दिलीप पांचाळ यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना चषक व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कबड्डी, खो-खो, लंगडी, क्रिकेट, हॉलीबॉल असे सांघिक व लांब उडी, उंच उडी, 100/200/400/800 मीटर धावणे, 1500 मी. धावणे, 3000 मी. चालणे, चेस, बॅडमिंटन असे व्यक्तिगत खेळ घेण्यात आले. उत्साह, शिस्त व स्पर्धात्मकतेने सजलेल्या या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे सर्वत्र कौतुक झाले. शेवटी मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे यांनी क्रीडा विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना भविष्यातील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.







