प्रशिक्षकाला आणखी एक संधी

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित मागील काही दिवसात त्यांच्या प्रशिक्षणाच्या स्टाईलमुळे चर्चेत आले होते. असे असतानाच मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने त्यांच्याबरोबरचा प्रशिक्षक म्हणून करार आणखी दोन हंगामासाठी वाढवला आहे. चंद्रकांत पंडित 2020 पासून मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यप्रदेशने 2022 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. तसेच, त्यानंतरच्या दोन हंगामात मध्यप्रदेश उपांत्य फेरीपर्यंतही पोहचला होता. मात्र, गेल्या काही दिवसात अनेक खेळाडूंनी पंडित यांच्या प्रशिक्षणाची पद्धत अत्यंत कठोर असल्याचे म्हटले होते. त्यांचे प्रशिक्षण वर्चस्वाचे आणि अत्यंत शिस्तप्रिय असल्याचे अशुतोष शर्मा, डेविस विसे आणि गौरव यादव यांनी म्हटले होते.

पण, त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू आंद्र रसेलने त्यांचे कौतुक केले होते. सध्या चंद्रकांत पंडित आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक आहेत. याचदरम्यान, आता मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजिव राव यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनमधील अधिकारी, वरिष्ठ सदस्य आणि आमच्या क्रिकेट समितीला पंडित हेच प्रशिक्षकाचे पद सांभाळण्यासाठी योग्य व्यक्ती वाटतात. त्याचमुळे आम्ही पुढच्या दोन हंगामांसाठीही त्यांनाच आम्ही कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. राव पुढे म्हणाले, त्यांच्या आगमनानंतर आमच्या क्रिकेटला फायदा झाला आहे. आम्ही फक्त 2022 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकलोच नाही, तर 23 वर्षांखालील स्पर्धेत संघ उपांत्य फेरीत आणि 16 वर्षांखालील स्पर्धेत संघ अंतिम फेरीत पोहचला. गेल्या हंगामात 12 पैकी आमचे 10 संघ बाद फेरीत पोहचले होते.

दरम्यान, आशुतोषने केलेल्या आरोपाबाबत राव यांनी सांगितले की, तो 16 वर्षांखालील संघात चांगला खेळला होता. पण त्याला नंतर अनेक संधी दिल्यानंतरही त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याचबरोबर तो निष्काळजीपणे फलंदाजी करायचा, जे चार-दिवसीय क्रिकेटमध्ये योग्य नाही. आणि लिस्ट एमध्ये देखील फारशी चांगली कामगिरी त्याने केलेली नाही.

Exit mobile version