अनुष्का शर्माची आणखी एक फिफ्टी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
वुमन्स अंडर 19 वनडे चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत सध्या अनुष्का शर्माचा बोलबाला दिसत आहे. इंडिया बीची कॅप्टन बॅटर अनुष्का शर्माने इंडिया डी विरुद्धच्या लढतीत आणखी एक लक्षवेधी खेळीची नोंद केली. पहिल्यांदा गोलंदाजी दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्यानंतर फलंदाजीवेळी संयमी खेळी करत तिने 135 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर इंडिया बीने 141 धावांचे लक्ष्य 1 विकेटच्या मोबदल्यात पार केले. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असताना अनुष्का शर्मा बाद झाली.
पहिल्यांदा बॅटिंग करताना इंडिया डी संघाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या 29 धावा असताना श्‍वेता सावंतच्या रुपात त्यांना पहिला धक्का बसला. त्यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. धावफलकावर 51 धावा असतान अर्धा संघ तंबूत परतला होता. काश्‍वी गौतमच्या 64 चेंडूतील 50 धावांच्या खेळीमुळे इंडिया डी संघाने 48.5 षटकात कशाबशा 140 धावा केल्या.
या अल्पधावसंख्येचा पाठलाग करताना त्रिशा आणि अनुष्का शर्मा या जोडीने इंडिया बी संघाच्या डावाला सुरुवात केली. दोघींनी अगदी संयमी खेळी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीन पहिल्या विकेटसाठी 138 धावांची भागादारी केली. 42 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर अनुष्का बाद झाली. तिने 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 135 चेंडूत 54 धावा केल्या. मुळची मध्यप्रदेशची असलेल्या अनुष्काने गोलंदाजीवेळीही दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. दुसर्‍या बाजूला त्रिशाने 116 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 78 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
वुमन्स अंडर 19 चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत यापूर्वी अनुष्का शर्माने इंडिया ए विरुद्धच्या लढतीतही लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली होती. या सामन्यात तिना 72 धावांसह 5 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीनंतर बीसीसीआयच्या एका ट्विटमुळे ती चांगलीच चर्चेत आली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कधी क्रिकेटमध्ये आली? असा प्रश्‍न नेटकर्‍यांना पडला होता. याविषयाची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे पाहायला मिळाले होते.

Exit mobile version