| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदमाला आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.17) दुपारी पावणे बाराच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी पोहोचलेल्या सिडकोच्या कळंबोली अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. चार महिन्यांच्या अंतराने या ठिकाणी घडलेली ही दुसरी घटना असल्याने भारतीय खाद्य गोदमातील अपुर्या अग्निशमन यंत्रणेचे वाभाडे या घटनांमधून निघत असल्याने गोदामातील अग्निशमन यंत्रणा भक्कम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये लागलेल्या आगीत तांदळाची 50 किलो वजनाची 23 हजार सहाशे 86 पोती खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा तासांच्या अथक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याने पुढील अनर्थ त्यावेळी टळला होता. शुक्रवारी घडलेल्या घटनेनुसार गोदामातील 3 नंबरच्या बराकीत असलेल्या तांदळाच्या गोणी आगीमुळे धुमसत असल्याचे लक्षात येताच या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने धान्याचे जास्त नुकसान झालेले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी दिली आहे.