इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सर्वात मोठ्या रॉकेटने 36 वनवेब उपग्रह यशस्वी झेपावले

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्वात मोठ्या रॉकेट लाँच व्हेईकल मार्क III (LVM3) ने LVM3-M3 मोहिमेचा भाग असलेल्या 36 वनवेब उपग्रहांना 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित केले आहे. जे वनवेब इंडिया-2 मिशन म्हणूनही ओळखले जाते. हे लंडनस्थित कंपनी वनवेबचे 18 वे प्रक्षेपण आहे. या वर्षातील तिसरी मोहिम आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून (launch pad) उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. LVM3 ने सलग सहाव्यांदा यशस्वी कामगिरी केली आहे. इस्रोची व्यावसायिक शाखा आणि न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) सोबतच्या व्यावसायिक करारांतर्गत वनवेबसाठी हे दुसरे मिशन राबविण्यात आले.

LVM3 ने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांचे एकूण वजन 5,805 किलो आहे. प्रक्षेपण वाहनाची उंची 43.5 मीटर आहे आणि त्याचे लिफ्ट-ऑफ वजन 643 टन होते. या मिशनने सर्व 36 उपग्रहांना अभिप्रेत असलेल्या कक्षेत यशस्वीरित्या ठेवल्याने वनवेबकडे आता एकूण 618 उपग्रह आहेत. या लॉन्चमुळे 2023 मध्ये जागतिक कव्हरेज सक्षम करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वनवेबचे Gen-1 (first generation) टार्गेट पूर्ण केले आहे. या मिशनने वनवेब हा टप्पा गाठणारा पहिला लो-अर्थ ऑर्बिटर ऑपरेटर ठरला आहे.

Exit mobile version