महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला

सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला लागलेले अनास्थेचे ग्रहण

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।

सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला लागलेले अनास्थेचे ग्रहण अजूनही सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. मागील दहा पंधरा वर्षात सी वर्ल्ड, हाऊस बोट, पर्यटनासाठी विराट युद्धनौका, अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांचे गाजर सिंधुदुर्गवासियांना दाखविण्यात आले. परंतु, दुर्दैवाने यातील एकही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. 2018 साली देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्ग मधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला असून महाराष्ट्राची पाणबुडी गुजरातमध्ये प्रगटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

समुद्राखालचे अंतरंग दाखविणारा प्रकल्प
भारताच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटनासाठी पाणबुडीची संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली होती. या प्रकल्पासाठी 56 कोटी निधी मंजूर झाला तर त्यातील काही निधी वितरितही झाला होता. मात्र वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि वर्षाला बदलणारे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक या गोंधळामुळे सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प बासनात गुंडाळला गेला आहे.

पाणबुडी प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये जिल्ह्याचे नाव देश पातळीवर वर गेले असते. परिणामी सिंधुदुर्गमध्ये उच्च दर्जाचे पर्यटन प्रस्थापित झाले असते. जिल्ह्यातील इतर किनारपट्टीवर पर्यटन वाढीस लागले असते. या प्रकल्पाची संकल्पना, अहवाल आणि निधीची तरतूदही करण्यात आली असताना नेमक्या अडचणी कुठे आल्या, याचे राज्यकर्त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण धडाडीने काम करण्यास प्रसिद्ध आहेत, त्यांनी नुकताच नौदल दिन यशस्वी करून दाखविला. यांनी जर सिंधुदुर्गच्या पाणबुडी प्रकल्पात लक्ष घातला तरच हा प्रकल्प पुढे जाऊ शकतो. अन्यथा गुजरातच्या स्वप्नांमध्येच धन्यता मानण्याची वेळ सिंधुदुर्ग वासियांवर येणार आहे.

कसा होता पाणबुडी प्रकल्प
सिंधुदुर्गात साकारला जाणारा पाणबुडी प्रकल्पात कर्मचाऱ्यांसह 24 प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून न्याहाळता येणार होती. या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तर 100 ते 150 कोटींची उलाढाल होणार होती.
Exit mobile version