| म्हसळा | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद शाळा आगरवाडा शाळेचा विद्यार्थी अंश अंकुश गाणेकर याने अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत 300 पैकी 250 गुणांसह अ श्रेणी मिळवून रायगड जिल्ह्यात आठवा, तर राज्य स्तरावर 13 वा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.
अंशला हे यश संपादन करण्यासाठी त्याचे वडील जिजामाता शिक्षण संस्थेचे कर्मचारी अंकुश गाणेकर, आई अनुष्का गाणेकर आणि शाळा शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले होते. अंशने प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केल्याने म्हसळा आगरवाडा गावाबरोबरच जिल्हा परिषद शाळा आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. अंशच्या यशाचे माजी सभापती, जिजामाता शिक्षण संस्था अध्यक्ष महादेव पाटील, संचालक मंडळाचे सदस्य, समाजसेवक तथा साहित्यिक रामचंद्र म्हात्रे, जिजामाता हायस्कूल शिक्षक संदीप कांबळेकर नितीन म्हस्के, दीपक म्हात्रे, अंगद कांबळे, आगरवाडा ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.