नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये खणखणीत यश
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई कामोठे येथील कराटे आणि महात्मा इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी अंतरा करांडे (12) हिने नवी दिल्ली येथील टॉकाटोरा इंडोर स्टेडियम येथे झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये प्रभावी कामगिरी करत रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा कराटे इंडिया ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित करण्यात आली होती. तर, या स्पर्धेचे यजमानपद कराटे असोसिएशन ऑफ दिल्लीने भूषविले होते. या स्पर्धेला वर्ल्ड कराटे फेडरेशन, एशियन कराटे फेडरेशन, कॉमनवेल्थ कराटे फेडरेशन आणि साऊथ एशियन कराटे फेडरेशन अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांची मान्यता लाभली होती. याआधी अंतराने ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य, झोन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण, वेस्ट झोन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण व झोन (महाराष्ट्र) स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे.अंतरा हिच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि उत्कृष्ट शिस्तीला तिचे प्रशिक्षक रोहन यादव यांनी विशेष दाद दिली. त्यामुळे कामोठे-नवी मुंबई आणि रायगडच्या कराटे क्षेत्रासाठी अंतरा हिचे हे यश प्रेरणादायी ठरले आहे.







