रामटेकवरून भाजपविरोधी खदखद

| नागपूर | प्रतिनिधी |

रामटेक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदाराला डावलून भाजपाने लादलेले उमेदवार देण्यात आल्याने शिवसेनेत खदखद असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर खुद्द विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी तिला वाट मोकळी करून दिली. शिवसेना फुटल्यानंतर खासदार कृपाल तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. परंतु भाजपाने लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरवण्यावरून प्रचंड दबाव एकनाथ शिंदे यांच्यावर निर्माण केला आहे. त्यामुळे ते विद्यमान खासदारांना देखील उमेदवारी देऊ शकत नव्हते. शिंदे सेनेपुढे एकतर उमेदवार बदलण्याचे किंवा भाजप ज्याचे नाव सुचवेल, त्याला उमेदवारी देणे हे दोनच पर्याय होते. त्यामुळे शिंदे सेनेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्याचा प्रत्यय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपुरातील देशपांडे सभागृहात आयोजित शिवसेना पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात आला, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

तुमाने यांनी उमेदवारी नाकारल्याचे दु:ख व्यक्त करताना 2019 ची निवडणूक आपण याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भरवशावर जिंकून दाखवली होती. मात्र, यावेळी काही लोकांनी साहेबांना सांगितले की, तुमच्याकडे लोक नाहीत. संघटना नाही. तुमाने हे घरातच बसले आहेत. काँग्रेसचे केंद्रीय नेते मुकुल वासनिक यांना हरवून मी निवडून आलो होतो. आता तर स्पर्धाच नव्हती. मी एक लाखावर मतांनी निवडून आलो असतो, अशा शब्दात तुमाने यांनी भाजपाच्या दबावतंत्रावर नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version