| मुंबई | प्रतिनिधी |
देशात आता परिस्थिती बदलली आहे. भाजपा विरोधी लाट आहे. जनतेचा रोष देशभरात आहे. महायुती अडचणीत आहे. उमेदवारीचा निर्णयच ते घेऊ शकत नाहीत. महाराष्ट्रात 40 च्या आसपास महाविकास आघाडी जाऊन पोहोचेल, असा मोठा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. मीडियाशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, पंतप्रधान मोदी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बेरोजगारी, महागाई, लोकांच्या समस्या यांवर बोलत नाहीत. या देशाचे दुर्देव असे आहे की, पंतप्रधान धर्मावर बोलतात, त्यांना वाटत धर्मावर बोलले की मते मिळतील. पंतप्रधान देशाचे आहेत. आतापर्यंत काय काम केले पुढे काय करू यावर बोलले पाहिजे. धार्मिक मुद्द्यावर ते बोलतात, मुस्लिम विरोधात बोलले कि हिंदू गठीत होतील असे त्यांना वाटते, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. नसीम खान यांची नाराजी दूर काँग्रेसमध्ये सध्या मानपमान नाट्य सुरू आहे. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यामुळे नसीम खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, एकाला उमेदवारी दिली की दुसरा नाराज होतो. महायुतीत तेच आहे. नसीम खान यांची नाराजी दूर होत असून, ते हाडाचे काँग्रेसचे आहेत. उमेदवार बदलणे वगैरे काँग्रेसमध्ये होत नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.