। पनवेल । वार्ताहर ।
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय पाच दिवसीय निवासी जादूटोणा विरोधी कायदा वक्ता प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा अतिशय उत्साहात संपन्न झाली.
राज्यभरातील निवड झालेल्या 110 वक्त्यांनी या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतले. स्थानिक श्री जैन वागड समाज सभागृहात हे पाचदिवसीय प्रशिक्षण लोणावळा येथे पार पडले. कार्यशाळेकरिता महाराष्ट्रभरातून विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या 110 वक्त्यांची निवड करण्यात आली होती. या प्रशिक्षणार्थींना कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक व मार्गदर्शक व पी.आय.एम.सी.चे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या सखोल माहितीसह ड्रॅग अँड मॅजिक रेमिडिक्स अॅक्ट 1954, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्म आणि विज्ञान, कर्मविपाक सिद्धांत, विवेकवाद, भूतप्रेत, तंत्र-मंत्र, करणी, जादूटोणा, देवी-देवता अंगात येणे, बुवाबाजी व वक्तृत्व प्रशिक्षण या सर्व विषयांबद्दल सखोल प्रशिक्षण दिले.
या पाच दिवसात कार्यशाळेत दिलेल्या प्रशिक्षणाबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींची पी.आय.एम.सी. समितीद्वारे लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यांच्याकडून चमत्कार प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र राज्याचे सचिव सुमंतजी भांगे यांनी आभासी पद्धतीने उपस्थित राहून केले. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे समाजकल्याण आयुक्त तथा सदस्य सचिव पीआयएमसी डॉ. प्रशांत नारनवरे, तर मुख्य मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून पीआयएमसीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव व प्रमुख उपस्थिती म्हणून पीआयएमसीचे सदस्य मधुकर कांबळे, सुरेश झुरमुरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन पी.आय.एम.सी. सदस्य हरिभाऊ पाथोडे यांनी, तर आभार प्रदर्शन पी.आय.एम.सी. सदस्य मधुकर कांबळे यांनी केले. तांत्रिक बाजू सुरेन सुनंदा यांनी सांभाळली, तर त्यांना जगन्नाथ साबळे यांनी सहाय्य केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.हरिभाऊ पाथोडे, रवींद्र खानविलकर, शरद वानखडे, चंद्रकांत झटाले या आयोजन-नियोजन समितीने परिश्रम घेतले. सदर प्रशिक्षण कार्यशाळेत मुंबई जिल्हातून संकल्प संस्थाचे अध्यक्ष विनोद हिवाळे, कालिदास रोटे तसेच आदर्श सिद्धांत वेल्फेअर फाउंडेशनचे संचालक शैलेश विवेकानंद सोनावणे सहभागी झाले होते.