जिल्हा रुग्णालयात तंबाखू विरोधी दिन साजरा

| अलिबाग । वार्ताहर ।
31 मे हा दिवस जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो, याचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला. सकाळी तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ विरोधी रॅलीचे आयोजन अलिबाग शहरातील बाजारपेठ, दुकान व वस्ती परिसरातून करण्यात आले. यात सहभागी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तंबाखू विरोधी घोषण देऊन अलिबागकारांचे लक्ष वेधले. सदर रॅलीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी झेंडा दाखविला तसेच नर्सिंग कॉलेज अलिबागमध्ये तंबाखूचे आणि तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम दर्शविणारी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्या पोस्टारची रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रदर्शनी लावण्यात आली आहे.

सदर कार्यक्रमाची सुरुवात पोयनाडच्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तंबाखू विरोधी गीत गाऊन झाली. त्यानंतर नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थांनी पथनाट्य सादर करून त्यात तंबाखूचे सेवन किती वाईट आहे तसेंच त्याचे दुष्परिणाम याबाबत पथनाट्यातून उपस्थित रुग्ण आणि प्रेक्षकांची जागृती केली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि पोयनाड शाळेच्या विद्यार्थीनींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या दिनानिमित्त अमोल शिंदे, न्यायाधीश तथा जिल्हा सचिव विधी सेवा प्राधिकरण अलिबाग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. प्रमोद गवई अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्याच बरोबर श्री. धमोडा, डॉ. विकास पवार, डॉ. देशमुख, अनिता भोपी, सौ म्हात्रे आदी उपस्थित होते

यावेळी मुखाच्या कॅन्सर आणि तपासणी विषयी डॉ देशमुख यांनी माहिती दिली, तर डॉ. प्रमोद गवई तंबाखूचे कुटूंबावर कसे दुष्परिणाम होतात त्याच बरोबर या व्यसना पासून कसे दूर राहता येईल निरोगी आयुष्य कसे जगता येईल या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. न्यायाधीश अमोल शिंदे जिल्हा यांनी तंबाखू विरोधी गीत सादर करणार्‍या मुलांचे कौतुक केले. आणि आपली तरुणांनी व्यसना पासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील साईकर यांनी केले तर आभार हितेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रमोद गवई यांनी तंबाखू पासून दूर राहण्याची सर्वाना शपथ दिली. तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यासाठी आणि आयोजनासाठी डॉ. किरण पाटील मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, डॉ. सुधाकर मोरे, डॉ. सुहास माने, डॉ. सागर काटे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version