नागरी सेवा परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर; एकूण 958 उमेदवार परीक्षा उत्तीर्ण
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात डॉ. अतुल अग्निहोत्री यांनी देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. एकूण 958 उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, त्यात राज्यातील उमेदवारांच्या यशाचा डंका वाजला आहे.
यूपीएससीतर्फे ऑगस्ट 2025 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. त्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), केंद्रीय सेवा गट अ आणि गट ब या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. डॉ. अनुज अग्निहोत्री यांनी देशात पहिले, राजेश्वरी सुवे एम. यांनी द्वितीय, आकांश धुल्ल यांनी तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
दरम्यान, आयोगाने विविध सेवांसाठी एकूण 958 उमेदवारांची शिफारस केली असली, तरी अंतिम नियुक्त्या संबंधित सेवांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येवर अवलंबून असतील. भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (आयएएस) एकूण 180 पदे, भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) साठी एकूण 55 पदे, आयपीएससाठी 150, केंद्रीय सेवा गट अ साठी 507, गट ब साठी 195 पदे उपलब्ध असतील.
जाहीर केलेल्या निकालामध्ये 348 उमेदवारांची शिफारस सध्या तात्पुरत्या स्वरूपातील आहे, तर 2 उमेदवारांचे निकाल सध्या रोखून ठेवण्यात आले आहेत. शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनी केलेल्या सर्व आरक्षण दाव्यांची अंतिम पडताळणी संबंधित प्राधिकरणांकडून केली जाणार असल्याचे निकालाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील उमेदवारांचा डंका
निकालातील पहिल्या 100 क्रमांकांत राज्यातील उमेदवारांनी स्थान प्राप्त केले आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, किरण कामठे यांनी 53वा, हृषिकेश अलासे यांनी 61वा, सायली पगार यांनी 87वा, दीक्षा पाटकर यांनी 88वा क्रमांक पटकावला आहे. तर अंकिता पाटील यांनी 140, कार्तिक बच्छाव यांनी 177, राहुल पाटील यांनी 225, शुभम बेहेरे यांनी 226, ऋषिकेश पालीमकर यांनी 283, मोहिनी जगताप यांनी 323, हर्षवर्धन पाटील यांनी 349, हर्षवर्धन तिडके यांनी 355, कुणाल अहिरराव यांनी 430, अभिषेक मगदूम यांनी 449, धनश्री अहिरे यांनी 489, तर मनोज पाटील यांनी 493वा क्रमांक मिळवला आहे.






