पर्यटकांना आकर्षित करतोय अणुस्कुरा घाट

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

निसर्गासोबत पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वेगवेगळ्या पर्यटनस्थळी भेट देत असतात. असेच एक ठिकाण पर्यटकांना आकर्षित करत आहे ते म्हणजे राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात असलेला अणुस्कुरा घाट. निसर्गसौंदर्याची झळाली मिळालेल्या अणुस्कुरा घाटातील नागमोड्या वळणांच्या रस्त्यावरून प्रवास करताना अवखळपणे उंचावरून कोसळणारे धबधबे, दुर्मिळ वन्यजीवांचा वावर आणि पायथ्याशी वसलेल्या वस्तीमुळे होणारा स्वर्गाचा भास याचा अनुभव घेताना पर्यटकांना वेगळीच अनुभूती मिळत आहे.

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा अणुस्कुरा घाट पावसामुळे निसर्गसौंदर्याने न्हावून गेला आहे. उन्हाळ्यात रूक्ष वाटणारा हा घाट हिरवळीमुळे हिरवा शालू पांघरल्यासारखा भासत आहे. तसेच, या घाटातील सुळक्यासारखे सुमारे पंधरा-वीस फुटापेक्षा उंचच असलेले मोठे दगड आकाशाला भिडल्यासारखा भास होतो. या घाटात अनेक ठिकाणी छोटे-मोठे असे शंभरहून अधिक धबधबे उंचावरून अवखळपणे कोसळत आहेत. आणि या धबधब्यांखाली बसून मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकही आसुसलेले दिसतात. येथील धबधब्यांचे उडणारे तुषार रस्त्यातून जा-ये करत अंगावर झेलताना वेगळा आनंद मिळतो. मात्र, हे धबधबे असलेल्या ठिकाणी जाण्याची वाट अवघड असल्याने तिथे पोचणे अशक्य आहे.

घाटाच्या पायथ्याशी स्वर्ग
घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा प्रकल्प आणि घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन वसाहती पाहताना घाटाच्या पायथ्याशी स्वर्ग अवतरल्याचा भास होतो. या परिसरात अनेक वन्यजीव, प्राण्यांना पाहण्याचीही अनोखी संधी मिळते. त्यामुळे आपसूकच पर्यटकांचीही पावले या घाट परिसराचा आनंद लुटण्यासाठी वळत आहेत.
सोयीसुविधांचा अभाव
अणुस्कुरा घाटाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी आवश्यक सोयीसुविधांचा अभाव आहे. पर्यटकांना राहण्यासाठी चांगली निवास व्यवस्था नाही, पर्यटकांना घाटाची माहिती देणारे गाईड नाहीत, पर्यटकांना ये-जा करण्यासाठी गाड्यांची सुविधा नाही. या सार्‍या सुविधा उपलब्ध झाल्यास अणुस्कुरा घाट पर्यटकांसाठी वेगळीच मेजवानी ठरणार आहे.
Exit mobile version