वेशभूषा स्पर्धेत अन्वी काटकर प्रथम

। अलिबाग । वार्ताहर ।
चेंढरे ग्रामपंचायत सदस्य प्रणिता म्हात्रे यांनी पंचायत हद्दीत राहणार्‍या दहा वर्षांखालील मुलांमुलींसाठी कान्हा (बाळकृष्ण) रूपातील वेशभूषेची छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी कान्हा रूपातील वेशभूषा करून त्याची छायाचित्रे मागविण्यात आली होती. या स्पर्धेत 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे परीक्षण करून विजयी स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि रविवारी विद्यानगर पश्‍चिम येथील समाज मंदिराच्या सभागृहात एका कार्यक्रमात विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले तसेच अन्य सर्व सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत राहणार्‍या मुलांमुलींसाठी आयोजित केलेल्या वेशभूषा छायाचित्र स्पर्धेत अन्वी नितीन काटकर या मुलीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक (विभागून) स्वरा शहा आणि साईशा नागोठकर यांनी मिळविला तर तृतीय क्रमांक (विभागून) योग नागे, सिया मोरे आणि रुद्राणी तोडकर यांना मिळविला.
यावेळी चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती पाटील, अलिबाग पंचायत समितीच्या उपसभापती मीनल माळी, ग्रामपंचायत सदस्य प्रणिता म्हात्रे, लीना आंबेतकर, निर्मला फुलगावकर साईनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई, उपाध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, सचिव महेश कवळे, खजिनदार प्रभाकर माळवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version