कोणतीही स्पर्धा निकोप असली पाहीजे- रोहन शिंदे

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

कोणतीही स्पर्धा ही निकोप असली पाहिजे. स्पर्धेला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागता कामा नये याची दक्षता सर्व खेळाडू, शिक्षक व प्रेक्षकांनाही घ्यावी असे आवाहन मुरुडचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी मुरुड तालुकास्तरीय शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या प्रांगणात आजपासून सुरू झालेल्या चौदा, सतरा व एकोणिस वर्षे वयोगटातील मुले मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिंदे यांनी केले त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुरुड तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, तालुका क्रीडा समन्वयक महेश पाटील, यशवंतनगर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर ओव्हाळ, पर्यवेक्षिका अर्चना खोत व अन्य मान्यवरांसह विविध शाळांतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

12 सप्टेंबर पर्यंत चालणार्या या स्पर्धेत कबड्डी सह खो-खो, बुद्धीबळ, कुस्ती, व्हॉलीबॉल व मैदानी खेळ घेण्यात येणार आहेत. महेश पाटील सह दत्तात्रेय खुळपे, बालाजी घुगे, आशिष बुल्लु, सातामकर सर, महेंद्र पाटील, हुजेफा सर, मनोज सुर्वे, पवार सर, साहिल अन्सारी, सागर राऊत, महेश वाडकर आदी शिक्षक स्पर्धेसाठी सहकार्य करीत आहेत. मुरुड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी स्पर्धक मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले आहेत.

Exit mobile version