। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र भूषण तथा ज्येष्ठ निरुपणकार स्व. डॉ. नारायण उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारने अलिकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. आप्पासाहेबांचा सन्मान हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. अध्यात्माच्या सामाजिक कार्याला वाहून घेतलेले ज्येष्ठ समाजसेवक तथा निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची दखल आज संपूर्ण जगाने घेतली असताना समाजकार्याला विरोध करणार्या संभाजी ब्रिगेडने पुरस्काराबाबत घेतलेल्या आक्षेपाबाबत शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
आप्पासाहेबांनी नानासाहेबांच्या नंतर अध्यात्म आणि सामाजिक सेवेचा त्यांचा वारसा समर्थपणे चालवला आहे. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचं मोठं कार्यही केलं आहे. अशा तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वेचणार्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण जाहिर झाल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांचा गौरव होत आहे. मात्र समाजासाठी तळागाळात कार्य करणार्या आप्पासाहेबांना विरोध करणे म्हणजे समाजातील कार्याला, विकासाला विरोध करण्यासारखे आहे, असेही त्यांनी म्हटले.
आजपर्यंत आप्पासाहेबांनी श्रीबैठकीशिवाय अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी धर्माधिकारी कुटुंबियांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या. यासोबतच आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. श्रीसदस्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी माध्यमातून ते समाजोपयोगी कार्य करत असतात आणि समाज प्रबोधन करत असतात.
आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. या संस्थेने सर्वाधिक वृक्षारोपण करीत पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्यही केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचं आयोजनही नियमितरीत्या करण्यात येतं. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. स्वच्छतादूत अशी आप्पासाहेबांची ओळख आहे. त्यामुळे अशा थोर व्यक्तीमत्वाला विरोध करणे चुकीचे असून संभाजी ब्रिगेडच्या विरोधाचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.