। कोलाड । प्रतिनिधी ।
आगामी येणारे सर्व सण उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात व शांततेत साजरा करावे. या सणांना गालबोट लागणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी केले आहे.
आगामी होऊ घातलेले जन्माष्टमी, गणेशोत्सव व अन्य विविध सणांच्या निमित्ताने कोलाड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 07) सपोनि नितीन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटी सदस्यांची सभा पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सपोनि नितीन मोहिते यांनी सांगितले की, आगामी काळात येणारे सर्व सण पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार साजरे करावे. या दरम्यान कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची प्रत्येकांनी दक्षता घ्यावी. सामाजिक सलोख्याची परंपरा राखत गुण्यागोविंदाने सण साजरे करा. तसेच, दहीहंडी व गणेशोत्सव साजरा करताना लाऊडस्पीकरसाठी ऑनलाइन परवानगी अर्ज करावे, मिरवणुकीत डीजे वाजवू नये.
तसेच, कोलाड खांब, सुतारवाडी परिसरात कोणत्याही प्रकारचे बॅनर लावायचे असल्यास संबधितांनी प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. विना परवाना बॅनर्स लावण्याने कारवाई संकेत देखील पोलिसांनी दिले. कोलाड विभागात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कोलाड सपोनि नितीन मोहिते यांनी केले आहे.






