वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील प्रयोगशील शेतकर्यांचा निर्णय; स्ट्रॉबेरीऐवजी करणार सफरचंदाची लागवड
। पनवेल । दीपक घरत ।
पनवेल तालुक्यातील वातावरणात होत असलेल्या बदलामुळे यंदा स्ट्रॉबेरीची शेती न करता सफरचंदाची शेती करण्याचा विचार तालुक्यातील प्रयोगशील शेतकर्यांनी केला असल्याची माहिती शेतकरी प्रशांत पवार यांनी दिली आहे. या करिता ते राज्यातील इतर भागात सफरचंदाची यशस्वी लागवड केलेल्या शेतकर्यांच्या संपर्कात असून, त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास पनवेलमध्ये देखील सफरचंदाचे उत्पादन मिळू शकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.
महाबळेश्वर येथे होणारी स्ट्रॉबेरीची शेती राज्यातील इतर भागात देखील करता येऊ शकते हे राज्यातील प्रगतीशील शेतकर्यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवून दिले आहे.पनवेलमधील शेतकर्यांनीही 2019 मध्ये महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग पनवेलमध्ये यशस्वी करून दाखवला आहे. महाबळेश्वर येथून रोप आणून पनवेल येथील शेतीत हा प्रयोग करण्यात आला होता. अति थंडी असणार्या वातावरणातच स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते, हे समीकरण यामुळे येथील सज्जन पवार आणि प्रशांत पवार यांनी बदलून दाखवले होते.
पवार यांच्या प्रयोगशीलतेचे त्यावेळी प्रांताधिकारी दत्ता नवले यांनीदेखील कौतुक केले. पवार यांनी स्ट्रॉबेरीच्या केलेल्या यशस्वी लागवडीपासून प्रेरणा घेत तालुक्यातील इतर काही शेतकर्यांनी देखील मागील वर्षी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. यंदा मात्र लांबलेल्या पावसाळ्यामुळे अद्याप भात शेतीची कामे वेळेत पूर्ण झालेली नसल्याने नियमित हंगामात स्ट्रॉबेरीची लागवड करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या वर्षी स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय अद्याप तरी घेतला नसल्याचे मत शेतकर्यांनी व्यक्त केले आहे.
स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त इतर कोणते नवे पीक घेता येईल याची चाचपणी सुरु असताना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांनी सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवल्याने आपण सुद्धा पनवेलमध्ये सफरचंदाची लागवड करण्याच्या विचारात असल्याचे पवार यांनी सांगितले
यशस्वी शेतकर्यांचे मार्गदर्शन घेणार
काश्मीर तसेच हिमाचल प्रदेशसारख्या थंड हवामान असलेल्या प्रदेशात होणारी सफरचंदाची शेती महाराष्ट्रात सुद्धा यशस्वी होऊ शकते, हे राज्यातील काही प्रगतशील शेतकर्यांनी या पूर्वीच सिद्ध करून दाखवले आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे यंदा स्ट्रॉबेरीची लागवड न करता सफरचंदाची लागवड करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे व या करता राज्यात सफरचंदाची लागवड करण्यात यशस्वी ठरलेल्या शेतकर्यांचे मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती प्रशांत पवार यांनी दिली आहे.
स्ट्रॉबेरीची शेती न करण्याचा निर्णय
मागील वर्षी देखील अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या रोपांसाठी लागणार्या पोषक वातावरणाअभावी रोपांच्या लागवडीचे काम रखडले होते. यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून रोप टिकवण्याचा प्रयत्न करत काहीशा उशिराने रोपांची लागवड केली होती. चार शेतकर्यांनी आपापल्या भागात एकूण 3 ते साडेतीन एकरावर केलेल्या लागवडीनंतर रोपांची योग्य निगा राखली.शेण खत आणि लेंडी खताचा वापार करून धोक्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या रोपांना जगवण्यात त्या वेळी यश मिळवले असले तरी पावसामुळे स्ट्रॉबेरीची हजारो रोपे नष्ट झाल्याचा अनुभव असल्याने यंदा स्ट्रॉबेरीची शेती न करण्याच्या विचारात शेतकरी आहेत.