2005 पासूनच्या सरकारी कर्मचार्‍यांनासुद्धा निवृत्ती वेतन लागू करा – एन.डी. मारणे

| कर्जत | प्रतिनिधी |

‘संघटनेच्या माध्यमातून निवृत्ती वेतन धारकांना वेतन आयोग मिळण्यासाठी आपली संघटना नेहमीच प्रयत्नशील असते व यशस्वीदेखील होते. सरकारने 2005 पासून नोकरीत भरती झालेल्या नोकरदारांचे निवृत्ती वेतन बंद केले आहे. ते त्यांना लागू करावे, कारण 30-35 वर्षे हे नोकरदार काम करतात. त्यांना निवृत्तीनंतर वेतनाची आवश्यकता असते. सर्व तालुका व जिल्हा संघटनांनी राज्य संघटनेला आर्थिक मदत करावी’ असे आवाहन महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष एन.डी. मारणे यांनी येथे केले.

रायगड जिल्हा सेवानिवृत्त संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा कर्जतमधील रॉयल गार्डनच्या सभागृहात आयोजित केली होती. जिल्हाध्यक्ष धुरंधर मढवी यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे कार्याध्यक्ष वसंत वाबळे, सचिव लक्ष्मण टेंभे, संजय राऊत, रोहिणी क्षीरसागर, कर्जत तालुकाध्यक्ष रामचंद्र भवारे, सूर्यकांत चंचे आदी उपस्थित होते. तालुका उपाध्यक्ष ग.सि. म्हात्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भवारे यांनी प्रास्ताविकात सभेच्या आयोजनाबाबतची माहिती विशद केली.

सुरुवातीला संजय देशमुख यांनी ईशस्तवन, स्वागत गीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील गीत सादर करून वातावरणनिर्मिती केली. अहवाल वाचन एम. पी. वालेकर यांनी केले. त्यानंतर अनेक ठराव मांडण्यात आले. ते एकमताने मंजूर करण्यात आले. लक्ष्मण टेंभे यांनी ‘हल्ली मोबाईलचा वापर सर्रास सुरू आहे. आपणसुद्धा त्याचा वापर करून दररोज संपर्कात राहिले पाहिजे’ असे सूचित केले. धुरंधर मढवी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्यामला कदम यांनी, तर आभार प्रदर्शन रमेश खैरे यांनी केले.

याप्रसंगी अरुण मोकल, वासुदेव इंगळे, आत्माराम देशमुख, आनंद जोशी, चंद्रकांत केळसकर, दिलीप पडवळ, अनंत खडे, मारुती बागडे, शीला घरत, संगीता मुरकुटे, जयराम पवाळी आदींसह जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version