तेजस्विनी फाऊंडेशनचे जिल्हाधिकार्‍यांकडून कौतुक

विविध संस्थांचा व बचतगटांचा केला सत्कार
। कुसुंबळे । वार्ताहर ।
अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन भवन येथे लोकनेते, क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जनजागृती कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आदिवासी समाजासाठी कार्यरत असणार्‍या विविध निमशासकीय संस्थांचा, बचतगटांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपवन संरक्षक अधिकारी आशिष ठाकरे यांच्या हस्ते संस्थापिका जिविता पाटील यांच्या तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन अलिबाग रायगड यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी मा. डॉ. महेंद्र कल्याणकर, उपजिल्हाधिकारी बैनाडे, तहसीलदार मीनल दळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर आदी मान्यवर तसेच आदिवासी बचतगट व मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पोईलकर यांनी केले.
अंगणवाडी सेविका जिविता पाटील या गेली 15 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी संस्थेमार्फत गेली 2 वर्षे कोरोना काळात अनेक ठिकाणी मदतीचा हात देत जनजागृतीपर कार्य केले. आदिवासी समाजातील मुलांनी शिक्षणात पुढे येवून इतरांसाठी आदर्श बनले पाहिजे त्यासाठी त्या आदिवासी मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करीत असतात. त्यांनी 3 आदिवासी मुली शिक्षणासाठी दत्तक घेतल्या आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

Exit mobile version