| नेरळ | प्रतिनिधी |
कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत भात संशोधन केंद्रात भाताचे विविध वाण यांची संशोधन केले जाते. या सर्व भात वाणांची माहिती घेण्यासाठी आघाडीचे संगीतकार पद्मश्री सोनू निगम यांनी भेट दिली. यावेळी सोनू निगम यांनी भात संशोधन केंद्रातील विविध प्रकल्पांची पाहणी करत त्याचे कौतुक देखील केले.
देशातील आघाडीचे कोकण कृषी विद्यापीठ यांची किर्ती लक्षात घेऊन पद्मश्री सोनू निगम हे येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देऊन शेतीचे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी भात संशोधन केंद्रात पोहचले. कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी त्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित आणि शिफारशीत केलेल्या भाताच्या विविध सुधारित व संकरित जातींची गुणवैशिष्ट्ये यांची माहिती दिली. तसेच विविध फळपिके, मसाला पिके, कृषी यंत्रे आणि सुधारित अवजारांची इत्यंभूत माहिती दिली. शेतकऱ्यांचे भात शेतीतील कष्ट कमी करणारे सुधारित ड्रम सिडर आणि मनुष्य चलित लावणी यंत्र यांची वापरण्याची पद्धत ऐकून सोनू निगम हरखून गेले. विशेष म्हणजे किफायतशीर शेतीचे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यात कुटुंबीयांनी खूप रस दाखविला. येत्या हंगामात आपल्या फर्म हाऊसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे वाणांची लागवड केली जाईल, असे आश्वासन सोनू निगम यांनी दिले. भात संशोधन केंद्राच्यावतीने सोनू निगम यांना काळीमिरीची कलमे भेट दिली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य बाबू घारे तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनू जगताप आणि मंदार म्हसे उपस्थित होते.







