मराठा समाजातर्फे ‘एप्रिल फुल’ आंदोलन

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

राज्य शासनाने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा केवळ भास निर्माण केला. सध्या स्थितीत पोलिस भरतीसाठी उमेदवारांना नॉन क्रिमिलियर दाखला मिळत नाही. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी किशोर तावडे यांनी लक्ष घालून तात्काळ दाखले मिळतील याची उपाययोजना करावी. अन्यथा मराठा समाजासाठी आम्हाला ‘एप्रिल फुल’ आंदोलन करावे लागेल, असा इशारा सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

सावंत म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने (दि.26) फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेतले. परंतु, नॉन क्रिमिलियरचा दाखला उमेदवारांना अद्याप मिळत नाही. यासाठी खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ आणि सावंतवाडी प्रांत यांच्याशी चर्चा करून तेथे आलेल्या उमेदवारांना नॉन क्रिमिलियर दाखले देण्यासाठी चर्चा केली. परंतु, आता (दि.31) मार्च पोलिस भरतीची अंतिम तारीख आहे. त्यामुळे पुढच्या दहा दिवसांत सुटीचे दिवस वगळून ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया कशी काय होणार? हा बेरोजगार मराठा समाजाच्या तरुणांचा प्रश्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मोठी लढाई लढली. परंतु, सत्ताधारी त्यांनाच टार्गेट करत आहेत. यात मराठा समाजातील तरुण भरडला जात आहे. मराठा समाजाला आवश्यक दाखले ‘आपले सरकार’ या पोर्टलवर मिळत नाहीत. त्यामुळे आता आम्हाला जरी आचारसंहिता असली तरी आचारसंहिता बाजूला ठेवून समाजातील तरुणांना दाखले मिळावे म्हणून किंवा त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. (दि.31) मार्चपूर्वी हे दाखले मिळाले नाहीत तर बेरोजगार मराठा तरुण आंदोलन करतील.

Exit mobile version