पेणमध्ये रिक्षा चालकांची मनमानी

ग्राहकांकडून मनमानेल तशी भाडेआकारणी

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरातील रिक्षा चालकांच्या मुजोरीने आता टोक गाठले असून, शहरातील वेगवेगळ्या भागात वाटेल त्या पद्धतीने भाडेदराची आकरणी सुरू असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी मनमानेल त्यापद्धतीने भाडेआकारणी सुरू आहे. प्रवाशांची होणारी लूट थांबविण्याची मागणी होत आहे. रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडेआकरणी करीत नसतील तर लेखी तक्रार करावी, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगितले जात आहे. तर, काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच रिक्षाचालकांमुळे अन्य रिक्षाचालक बदनाम होत असल्याचे रिक्षा संघटनेचे म्हणणे आहे.

पेण शहरामध्ये मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही. शहरातील रिक्षा प्रवासासाठी मीटर पद्धतीचा अवलंब करावा, असा नियम आहे. मात्र, या नियमाची सर्रासपणे पायमल्ली केली जाते. मीटरऐवजी माणूस बघून भाडे आकरण्याची येथे जणू पद्धतच रुढ झाली आहे. रिक्षा चालक-मालक संघटनेने उपप्रादेशिक परिवाहन विभागाशी सल्लामसलत करुन मीटरप्रमाणेच भाडे आकरणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.

पेण शहर एमएमआरडीएमध्ये एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येत असून, याठिकाणी मीटरनुसार भाडे आकारणे गरजेचे आहे. परंतु, पेण शहरात एकही रिक्षा चालक मीटरनुसार भाडे आकारत नाहीत. मनमानेल तसे माणूस बघून भाडे आकारतात. पेण पोलीस ठाण्यापासून रामवाडीपर्यंत जायचे असेल तर 50 रूपयांपासून 100 रूपयांपर्यंत भाडे आकारले जाते. नगरपालिका नाक्यापासून रामवाडीकडे जायचे असेल तर 50 रूपयांपासून 80 रूपये भाडे आकारले जाते. पेण एसटी स्टँडवरून कुंभार आळीत जायचे असेल तर 30 ते 50 रूपये भाडे आकारले जाते. पेण एसटी स्टँडपासून प्रायव्हेट हायस्कूल, स्वामी कॉलेज, सार्वजनिक विद्या मंदिर, न्यू व्हिजन कॉलेज या ठिकाणी जाण्यासाठी 30 रूपयांपासून 100 रूपयांपर्यंत भाडे आकारले जातो. असे भाडे आकारणे नियमबाह्य आहे.

ग्राहकांनी विचारणा केल्यास रिक्षा चालक उडवाउडवीची भाषा करतात. जर महिला ग्राहक असतील, तर त्यांची बोलतीच बंद करतात. पुरूष ग्राहकांच्या तर अंगावर धावून जातात. आमची कुणाकडेही तक्रार करा, आम्ही घाबरत नाहीत. आमची युनियन आहे. अशा प्रकारे वाद घालून ग्राहकांचा अपमान करत असतात. पेण शहरात जेवढे रिक्षा थांबे आहेत, त्यांना नियमानुसार प्रादेशिक परिवहन खात्याने कोठेही थांबा दिलेला नाही. माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली असता ही बाब समोर आली की, पेणमधील सर्वच रिक्षा थांबे हे अनधिकृत आहेत. असे असताना रिक्षा चालक कोणाच्या जिवावर ग्राहकांशी भांडत असतात आणि ग्राहकांची लूट करत असतात. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देवकाते व युनियन लिडर दत्ता म्हात्रे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनी संपर्क करून विचारणा केली.

पेण शहरात मीटरनुसारच भाडे आकारायचे आहे. मधल्या काळात आम्ही मीटरदेखील रिक्षा चालकांकडून अपडेट करुन घेतले आहेत. आम्ही सक्ती करायला लागलो की युनियनवाले आवाज उठवतात आणि ग्राहकांची तक्रार नसताना तुम्ही आमच्यावर सक्ती करू शकत नाही, अशा प्रकारे वैचारीक वाद घालतात. ग्राहकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही म्हणून आमच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी, आम्ही नक्कीच कारवाई करू. ग्राहक आणि शासन एकत्र आल्यास सहज अरेरावी करणार्‍या रिक्षा चालकांविरूध्द कारवाई करता येईल.

महेश देवकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण

ग्राहक हे खर्‍या अर्थाने आमच्या रिक्षा चालकांचे दैवत आहेत. परंतु, काही रिक्षा चालक मुद्दामहून अरेरावी करून ग्राहकांची विनाकारण लूट करत आहेत, त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. प्रमाणाबाहेर जे भाडे आकारतात त्यांचे नंबर आरटीओला दिल्यास आमच्या संघटनेची काही हरकत नसणार आहे. बोटावर मोजणार्‍या काही रिक्षा चालकांमुळे रिक्षा चालक बदनाम होत आहेत, हे मला अध्यक्ष या नात्याने मान्य नाही.

दत्ता म्हात्रे, अध्यक्ष, तीनचाकी रिक्षा चालक-मालक संघटना, पेण
Exit mobile version