एसटी चालकाची मनमानी

प्रवाशांकडे दुर्लक्ष करीत मनाप्रमाणे थांबा

| रसायनी | वार्ताहर | ‘हात दाखवा, एसटी थांबवा’ या राज्य परिवहन महामंडळाच्या घोषणेचा एसटी चालक आणि वाहकांनाच विसर पडला असून, एसटी चालक त्यांच्या मनाप्रमाणे थांबा घेत आहेत. अशा चालकाची खालापुरातील तरुणीने चांगली खरडपट्टी काढल्याची घटना घडली आहे.  राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असताना प्रवाशांसाठी अनेक योजनांची खैरात करण्यात आली. प्रवासी संख्या वाढवण्यासाठी हात दाखवा एसटी थांबवा अशी योजना देखील सुरू करण्यात आली. परंतु, अधिकृत थांबा असतानादेखील एसटी चालक मनमानी करत ताटकळत बसलेल्या प्रवाशांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार खालापुरात घडला. खोपोली गावातून दुपारी चारच्या दरम्यान सुटणारी खोपोली-पनवेल एसटीची वाट बघत तरुणी अल्टा कारखान्याजवळ उभी होती. याठिकाणी एसटीचा अधिकृत थांबा आहे. जवळपास एक तासाच्या प्रतीक्षेनंतर एसटी क्रमांक क्रमांक एमएच-07-सी -7211 आल्यावर हात करूनदेखील चालकाने दुर्लक्ष करत एसटी पुढे नेली.  या प्रकाराने संतापलेल्या तरुणीने थेट रिक्षा करत खोपोली फाटा येथील बसस्थानकात एसटी गाठली. एसटीचे वाहक मस्के यांना एसटीने थांबवण्याचा जाब विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, मला तुमची तक्रार करायची आहे, तुमचा वाहक क्रमांक द्या, असं बोलल्यावर त्यांनी सारवासारव केली. मी चालकाला विचारतो असे सांगत एसटी न थांबविण्याचे कारण त्यांनी चालकाला विचारले. यावर पाऊस असल्यामुळे एसटी थांबवली नाही असे उत्तर देत चालकाने वेळ मारून नेली. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली एसटी अशाप्रकारच्या वाहक चालकांमुळे अरेरावीमुळे तोटा सहन करत आहे. खालापूर प्रवासी संघटना याबाबत आक्रमक झाली असून, अशा चालक आणि वाहकांवर कारवाईसाठी मागणी करणार आहे.

Exit mobile version