अंगणवाडीच्या जागेतून धनदांडग्यांना रस्ता खुला करण्याचा घाट
आंबोली सरपंचसह ग्रामस्थ आक्रमक
| अलिबाग | प्रतिनिधी |
अंगणवाडीच्या परिसरात उभारलेल्या कुंपणाला अनधिकृत ठरवून धनदांडग्यांसाठी रस्ता खुला करण्याचा घाट मुरूड तहसीलदारांनी घातला आहे,असा आरोप सरपंच शिल्पा मोकलसह संतोष मोकल यांनी केला आहे. तहसीलदारांच्या भूमिकेबाबत आंबोली ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी न्यायासाठी अलिबागमधील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अखेर धाव घेतली आहे.
अंगणवाडीतील मुलांच्या बौध्दीक क्षमतेबरोबरच शारिरीक क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग प्रोत्साहीत करीत आहे. मात्र मुरुडच्या तहसीलदारांकडून अंगणवाडीतील जागा वहिवाटीची असल्याचा दाव करीत धनदांडग्यांना देण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे.
ग्रामपंचायत आंबोली यांच्या मालकीच्या गावठाण जागेमध्ये अंगणवाडी बांधण्यात आली आहे. मुलांना खेळण्यासाठी गट नं. 597 मधून तुकाराम पाटील यांनी यासाठी देणगी स्वरुपात जागा दिली आहे. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करीत ग्रामपंचायतीने अंगणवाडीच्या परिसरात तारेचे कुंपण केले. मात्र मुरूडमधील जहाँगिर यांनी ही जागा पुर्वापार वहिवाटीचा असल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांनी मुरुड तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. तिच्या आधारे तहसीलदारांनी अंगणवाडी परिसरात केलेले कुंपण अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत ते तोडण्याचा घाट घातला आहे. त्यांच्या या कृत्याबाबत आंबोली ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ
अंगणवाडीच्या परिसरातील कुंपण 25 सप्टेंबर रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास तोडण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून करण्यात आला. याबाबत मुरूड पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र दहा दिवस उलटूनदेखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. पोलीस हवालदार गणेश डोंगरे यांच्याकडून दुय्यम दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.