| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरात विकासाच्या नावाखाली बांधकामांचा धडाका सुरू असताना, काही बांधकाम व्यावसायिकांच्या बेशिस्त कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली कामे, रस्त्यांवर पसरलेला मातीचा चिखल आणि रात्रीच्या अंधारात करण्यात येणारे खोदकाम यामुळे शहरातील बांधकामांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसेल, तर प्रशासन नेमके कोणाच्या हिताचे रक्षण करत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
पेणमधील महावीर मार्गावर एका विकासकाचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत काम सुरू राहत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रात्रीच्या शांततेत सुरू असलेल्या या कामांमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित कामाच्या पद्धतीत सुधारणा झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना प्रशासनाच्या लेखी काहीच किंमत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात काल रात्री घडलेल्या प्रकारामुळे संतापात आणखी भर पडली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत खोदकाम करण्यात आले आणि त्यातून निघालेली माती व इतर साहित्य राष्ट्रीय महामार्गाच्या जागेत टाकून भराव करण्यात आला. हा प्रकार नेमका कोणाच्या परवानगीने करण्यात आला? संबंधित जागेवर भराव करण्याची अधिकृत परवानगी होती का? तसेच खोदकाम आणि माती वाहतुकीसाठी आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या जागेचा वापर अशा प्रकारे केला जात असल्याचा आरोप खरा असल्यास, संबंधित यंत्रणांनी तातडीने स्थळपाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, या संपूर्ण प्रकाराकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या बांधकामामुळे केवळ परिसरातील रहिवासीच नव्हे, तर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. महावीर मार्गापासून अंतोरा फाट्यापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती पसरल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. वाहनांच्या वदर्ळीमुळे ही माती पसरत असून, काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
सकाळच्या वेळी शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक आणि मॉर्निंग वॉकसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक यांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेली माती आणि चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
बांधकामांना परवानगी देताना नगरपालिका प्रशासनाकडून विविध अटी व शर्ती घालून दिल्या जातात. बांधकामादरम्यान सार्वजनिक रस्त्यांवर माती व बांधकाम साहित्य पडू न देणे, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे अपेक्षित असते. मात्र, महावीर मार्गावरील परिस्थिती पाहता या अटी-शर्तींची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपालिका प्रशासनाने संबंधित बांधकामाची पाहणी करून नियमभंग आढळल्यास कारवाई करावी. महसूल विभागाने उत्खनन आणि महसूल भरण्याबाबतची कागदपत्रे तपासावीत. रस्त्यावर पडलेली माती तातडीने हटवून रस्ता सुरक्षित करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महावीर मार्गावरील या कथित नियमभंगाची निष्पक्ष चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवून प्रकरण गुंडाळले जाणार, याकडे आता संपूर्ण पेणकरांचे लक्ष लागले आहे.
अपघात झाल्यावर जबाबदारी कोणाची?
पेण शहरात विकासकामे झालीच पाहिजेत; मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. रात्री उशिरापर्यंत काम सुरू ठेवण्याबाबत लागू असलेल्या नियमांचे पालन होते आहे का, खोदकामासाठी आवश्यक परवानग्या आहेत का आणि राष्ट्रीय महामार्गाच्या जागेत करण्यात आलेल्या कथित भरावाला अधिकृत मान्यता आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
