ग्रामसेवकाचा मनमानी कारभार

उत्खननास नकार असतानाही दिली एनओसी; हरवित ग्रामस्थ आक्रमक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पिकत्या भातशेतीसह बागायती परिसरातील जागेमध्ये उत्खनन करण्यास हरवित ग्रामस्थांनी ग्रामसभेत विरोध दर्शविला. तसा ठरावही घेतला आहे. मात्र, प्रशासकीय राज आल्यावर ग्रामसेवकाने या ठरावाला केराची टोपली दाखवित उत्खनन करण्यास नाहरकत दाखला दिला. ग्रामसेवकाच्या या मनमानी कारभाराबाबत हरवित ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील हरवित गावाच्या गट नं. 121 व 131 या भागात 40 एकर क्षेत्र भात व बागायत असून, त्या परिसरात पाचपेक्षा अधिक विहिरी आहेत. तसेच पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत या भागात आहे. हा परिसर दुर्गम असून, शेती व मोलमजुरी करून येथील ग्रामस्थ त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असल्याचे सांगण्यात आले आहे.

या परिसरातील गट नं.121 मध्ये खाणकाम व उत्खनन करण्यासाठी रवींद्र चाळके यांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला होता. 16 फेब्रुवारी रोजी ग्रामसभेत या अर्जावर चर्चा झाली. त्यामध्ये हरवित येथील ग्रामस्थांनी एकमताने विरोध करून चाळके यांचा अर्ज फेटाळून त्यांना उत्खनन व खाणकाम करण्यास नकार दिला. तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर 20 फेब्रुवारीपासून या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले. ग्रामसेवक दीपक नेमाणे हे प्रशासक म्हणून काम करीत आहेत. हरवित येथील गट नं. 131 येथील जागेत खाणकाम व क्रशर प्लांट लावण्यास नाहरकत दाखला देण्यासाठी दादासाहेब सूर्यवंशी, अजय बिरवाडकर व विनोद गुप्ता या तिघांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. परंतु, ग्रामसेवक नेमाणे यांनी विस्तार अधिकारी सुनील मगर यांच्या मदतीने खाणकाम व उत्खनन करण्यासाठी ना हरकत दाखला दिल्याचा आरोप हरवित येथील ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासक बसविण्यापूर्वी या परिसरात खोदकाम करण्यास ग्रामसभेत निर्णय घेण्यात आला असतानाही ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता ग्रामसेवकांनी मनमानी कारभार करीत ना हरकत दाखला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामसेवक नेमाणे व विस्तार अधिकारी मगर यांच्या या कारभाराबाबत हरवित ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करीत संबंधितांविरोधात कारवाई करण्यात यावी व दिलेला ना हरकत दाखला रद्द करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे केली आहे. त्याबाबत 20 एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले आहे.

हरवित गावाच्या परिसरात भातशेती व बागायत जमीन आहे. शेतीसह अन्य कामकाज करून येथील ग्रामस्थ त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गट नं. 121 व गट नंबर 131 ही सामाईक जमीन असून, या परिसरात भातशेती व पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत आहे. ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी मनमानी कारभार करीत खाणकाम व उत्खनन करण्यासाठी दिलेली एनओसी बेकायदेशीर आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे या परिसराची मोठी हानी होण्याची भीती आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य तो न्याय ग्रामस्थांना द्यावा.

इम्तीयाज परकार, ग्रामस्थ

हरवित येथील गट नं. 121 येथील जागेत खाणकाम व उत्खनन करण्यास ग्रामस्थांनी हरकत घेतल्याने ते रद्द करण्यात आले. मात्र, गट नं. 131 येथील जागेच्या खोदकामबाबत कोणीही हरकत घेतली नव्हती. त्यामुळे एनओसी देण्यात आली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी 131 च्या जागेत खोदकाम करण्यावर विरोध केला आहे. ही माहिती ग्रामसेवकांना माहिती असतानाही त्यांनी कळविले नाही. मात्र, वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.

सुनील मगर, ग्रामविस्तार अधिकारी, श्रीवर्धन

हिरवत येथील गट नं. 131 मध्ये मालकीची जागा आहे. ग्रामपंचायतीमध्ये रितसर परवानगी घेतली आहे. सरकारी कामासाठी मटेरिअल पाहिजे. जंजिरा किल्ला आहे. त्या बाजूला सोलींग करण्यासाठी दगड लागणार आहे. ठेकेदाराला दगड पाहिजे. पाचशे ब्रासची रॉयल्टी काढली आहे. जागा विकत घ्या, अशी मागणी केली जात आहेत.

रवींद्र चाळके, दादासाहेब सूर्यवंशी यांचे पी.ए.
Exit mobile version