| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीने विडसईकडे जाणार्या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर सुशोभीकरण करून प्रवेशद्वार उभारले आहे. या प्रवेशद्वारावर भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विडसई बौद्धवाडी ग्रामस्थ व ऑल इंडिया पँथर सेनेने छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर या बहुजन महापुरुषांची कमान थाटली होती. सदरची कमान उंच, सुरक्षित व कायमस्वरूपी राहावी, अशी मागणी पँथर सेनेने केली होती. अखेर प्रवेशद्वारावर लावलेली महापुरुषांच्या प्रतिमेची कमान तीन फुटांहून अधिक उंच केली असल्याने ऑल इंडिया पँथर सेना व विडसई ग्रामस्थांच्या मागणीला आणि लढ्याला यश आले आहे.
सुधागडसह रायगड जिल्ह्यातील ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी आणि विडसई ग्रामस्थांनी वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कमान थाटण्याचे स्वप्न पाहिले होते. अशातच ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बहुजन महापुरुषांची कमान लावू असा इशारा दिला होता. अखेर ऑल इंडिया पँथर सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेशभाई गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वात बहुजन महापुरुषांची सर्वांगसुंदर आणि देखणी कमान उभारली गेली.





