इतिहासावर नवा प्रकाशझोत पडण्याची शक्यता
| चिरनेर | प्रतिनिधी |
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या घारापुरील बेटावरील एलिफंटा लेण्यांच्या परिसरात भारतीय पुरातत्व विभागाकडून मागील 4 महिन्यांपासून उत्खननाचे काम सुरू आहे. हे काम येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. या उत्खननातून घारापुरी बेटाच्या प्राचीन इतिहासाबाबत नवी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही घारापुरी बेटावर विविध ठिकाणी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुरातन काळातील अनेक वस्तू आढळल्या आहेत. दळणकांड करण्यासाठी वापरण्यात येणारी साधने, मडकी, शिवलिंग तसेच विविध पुरातन वस्तूंचे भग्न अवशेष अनेकदा सापडले असल्यामुळे या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पुरातत्व सर्वेक्षण विभागाने बेटावर आणखी सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर 2025 पासून घारापुरी बेटावर अधिक खोलवर अभ्यास करण्यासाठी उत्खननास सुरुवात केली आहे. शेतबंदर गावातील स्मशानभूमीपासून सीता गुंफेपर्यंत सुमारे 1 हजार मीटर लांबीच्या नाल्यात आणि त्याच्या परिसरात मागील चार महिन्यांपासून उत्खननाचे काम सुरू आहे. हे उत्खनन येत्या मे 2026 पर्यंत सुरू राहणार असून, या सर्वेक्षणातून आणि खोदकामातून घारापुरी बेटाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्यास मदत होईल, असा विश्वास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, उत्खननादरम्यान सापडलेल्या दुर्मिळ पुरातन वस्तू किंवा या कामाचे निष्कर्ष अधिकृत सर्वेक्षण पूर्ण होण्यापूर्वी जाहीर करणे योग्य ठरणार नसल्याचेही विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.







