वर्ध्यात रामदास तडस कुटुबांत वादाचा तडका

सासरा विरुद्ध सून लढत रंगणार

| वर्धा | वृत्‍तसंस्था |

वर्धा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे. भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात त्यांच्या स्नुषा पुजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अशातच आज पुजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा पंकज तडस यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत हा अर्ज अद्याप परत घेतला गेला नाही. सुनेचे पुजा पंकज तडस (शेंदरे)असे नाव असून अर्ज वैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा मतदारसंघात खासदार सासऱ्याविरुद्ध सून निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. म्हणूनच या राजकीय लढाईला मिळणाऱ्या वळणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पूजा आणि पंकज यांच्या विवाहाचे किस्से एकेकाळी बरेच गाजले होते. आज घडीला या मतदारसंघात नेहमीच्या राजकीय लढाई व्यतिरिक्त सासऱ्याविरुद्ध सून अशी लढत देखील रंगणार असल्याचे चित्र आहे.

खासदारांच्या सून असलेल्या पूजा तडस यांच्या उमेदवारीने मतदारसंघात राजकीय चर्चा सुरू झाल्या आहे. दरम्यानच्या काळात पूजा यांच्यावर, आपल्या लहान मुलाला घेऊन एकटे, कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर, मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी ही लढाई लोकशाही मार्गाने लढली जात असल्याचा दावा केला जात आहे. राजकीय क्षेत्रात या उमेदवारीनचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. एकीकडे, तडस कुटुंबातील वाद यानिमित्ताने चर्चेत आला असतानाच पूजा यांच्यामागे नेमके कोण भक्कमपणे उभे आहे, हाही प्रश्न वर्धेच्या राजकारणात विचारला जाऊ लागला आहे. या सत्ताकारणांच्या सारीपाटात नेमका विजय कुणाचा होतो हे जरी आज स्पष्ट होत नसले तरी पुन्हा एकदा महिला सक्षमीकरण या मुद्द्यावर विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महिला म्हणून नामांकन दाखल करणाऱ्या तडस यांच्या सुनेने मात्र या उमेदवारी दाखल करून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.

Exit mobile version