गव्हाण येथील सशस्त्र दरोड्याचा छडा

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल जवळील गव्हाण गावात पहाटे घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सुमारे 9 लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा उलवा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून वाहनांसह सुमारे 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास गव्हाण येथील 53 वर्षीय महिलेच्या घरात प्रवेश केला. त्यांनी चाकूचा धाक दाखवत घरातील व्यक्तींना धमकावल्यानंतर सुमारे 5 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 लाख रुपये रोख असा ऐवज घेऊन ते पसार झाले. या घटनेनंतर उलवा पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींचा माग काढत पोलिसांनी बदलापूर व ठाणे परिसरातून काही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून गव्हाण परिसरातील अन्य आरोपींची माहिती समोर आली. त्यानंतर आणखी तिघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रोहित शांताराम मालुसरे (27), सुरज राजू गायकवाड (19), दिपेश सुरेश भोईर (23), प्रविण सदानंद कोळी (31) आणि फरहान अल्ताफ शेख (19) यांचा समावेश आहे. टोळीतील आणखी काही आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Exit mobile version