। ठाणे । प्रतिनिधी ।
भरदुपारी सशस्त्र दरोडा पडल्याची घटना वसईतील निवासी संकुलात घडली आहे. तीन दरोडेखोरांनी घरात घुसून मुलाला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले तर घरातील महिलेला भोसकले. त्यानंतर या दरोडेखोर 10 लाखांचा ऐवज लुटून पसार झाले. यावेळी आरोपींनी केलेल्या या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
वसई पूर्वेकडील वालीव सातिवली परिसरातील रिलायबल ग्लोरी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात राऊत कुटुंबीय राहतात. सोमवारी (दि.17) दुपारी दीडच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी इमारतीत शिरकाव केला. राऊत यांच्या दारावरील बेल त्यांनी वाजवली. त्यानंतर राऊत यांच्या 15 वर्षांच्या मुलाने दार उघडले. चेहऱ्यावर मास्क लावलेल्या तिघांनी मुलाला जोरदार धक्का दिला आणि घरात जाऊन मुलाला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले. तर स्वंयपाकघरात असणारी मुलाची आई संगीता राऊत तिच्यावरही चाकूने हल्ला करून त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर त्यांच्याकडून कपाटाची चावी घेतली आणि कपाटात असलेले तब्बल 10 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन दरोडेखोर त्यातून पसार झाले. दरोडेखोरांच्या हल्ल्यात संगीता राऊत या जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी पोलिसांची 4 पथके तयार करण्यात आली असून गुन्हे शाखेचे पथकही समांतर तपास करत आहे.
वसईत भरदिवसा सशस्त्र दरोडा
