सीबीआय, पोलीस आणि मनी लॉन्ड्रिंगच्या नावाने भीती
| उरण | प्रतिनिधी |
‘डिजिटल अटक’ आणि ‘मनी लॉन्ड्रिंग’च्या नावाने सायबर भामट्यांनी उरणमधील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 29 लाख 36 हजार 94 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. टेलिकॉम कंपनी, सीबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी धमकावले. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 14 जुलै रोजी एका महिलेने फोन करून आपण टेलिकॉम कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. मुंबईत त्यांच्या नावाने बनावट सिमकार्ड वापरले जात असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या क्रमांकांवरून आरोपींनी संपर्क साधला. एकाने स्वतःला तपास अधिकारी, दुसऱ्याने सीबीआय अधिकारी तर तिसऱ्याने पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले.
‘मनी लॉन्ड्रिंग, अमली पदार्थांची तस्करी आणि मानवी तस्करीच्या प्रकरणात तुमचे नाव आहे. तुमच्या नावाने बँकेत 78 लाख रुपये जमा झाले आहेत,’ अशी भीती दाखवत अटकेची धमकी देण्यात आली. या दबावाला बळी पडून ज्येष्ठ नागरिकाने 14 जुलै ते 12 ऑगस्टदरम्यान आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये तब्बल 29 लाख 36 हजार 94 रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी 17 ऑगस्ट रोजी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल काटवाणी करीत आहेत.
सीबीआय, पोलीस किंवा अन्य कोणतीही सरकारी यंत्रणा फोनवरून पैसे मागत नाही अथवा ‘डिजिटल अटक’ करीत नाही. अशा प्रकारचा संशयास्पद फोन आल्यास घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच 1930 या सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन उरण पोलिसांनी केले आहे.
