मुंबई पोलिसांनी दाखल 1800 पानांचे पुरवणी आरोपपत्र
। मुंबई । प्रतिनिधी ।
टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर नऊ महिन्यांनी पोलिसांनी अर्णब गोस्वामींचे नाव आरोपपत्रात दाखल केले आहे.
पोलिसांनी कोर्टात 1,800 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यात गोस्वामी आणि एआरजी आऊटलर मीडिया यांच्यासह आणखी चार लोकांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना दोषी ठरवले होते. ज्यामध्ये जीन ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) इंडियाचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ विकास खानचंदानी यांचा समावेश आहे.
24 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने गोस्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर अटकेपासून मर्यादित संरक्षण दिले होते. याचिकेमध्ये पोलीस, विशेषत: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला होता.