प्रवीण दरेकरांना अटक करा; आ. मनीषा कायंदेची मागणी

विधान परिषदेत गोंधळ
| मुंबई | प्रतिनिधी |

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांचा पदाचा राजीनामाही घेतला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार अ‍ॅड. मनीषा कायंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. मुंबईतल्या माता रमाबाई पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजपच्या आमदारांनी हे प्रकरण उचलून धरले. दरेकरांवर सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो त्वरित रद्द करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी लावून धरली.

सभागृहात यावरून गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तब्बल दोन वेळा तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू होताच पुन्हा भाजपच्या आमदारांनी आपली मागणी रेटून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे सभापतींनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभराकरिता तहकूब केले. यात प्रश्‍नोत्तरे पुकारली, मात्र लक्षवेधी अनुत्तरित राहिल्या. मुंबईतल्या ’आप’ पक्षाचे सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई पोलीस ठाण्यात मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी बोगस संस्थांना वारेमाप कर्जवाटप करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे, अशी तक्रार दिली होती. त्यावर मंगळवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे राजकीय पडसाद विधान भवनात उमटले.

Exit mobile version