| नाशिक | वृत्तसंस्था |
नाशिक मध्य’मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत गिते यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी ईव्हीएम मशिन हॅक करून आमिष दाखविणाऱ्या भामट्याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अवघ्या काही तासांत अटक केली आहे. राजस्थानातील असलेल्या भामट्याने त्यासाठी 42 लाखांची मागणी केली होती. नकार दिल्याने भामट्याने त्यांना पराभूत करण्याचीही धमकी दिली होती. भगवानसिंग नारायण चव्हाण (34), राजस्थान असे संशयित भामट्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाका येथे असलेल्या शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार वसंत गिते यांना मंगळवारी (दि.5) चव्हाण हा संशयित भेटायला आला होता. त्याने उमेदवार गिते यांना विजयी करण्यासाठी ईव्हीएम मशिन हॅक करून 10 पैकी तीन ते चार मते मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्याने 42 लाखांची मागणी करीत पाच लाख आगाऊ मागितले. मात्र संबंधितांनी त्यास नकार दिला असता, संशयिताने गिते यांना पराभूत करण्यासाठीची धमकी दिली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली आहे.