माणगावमध्ये मेडीकलमध्ये गोळ्या झाडणारे जेरबंद

प्रेमात अडसर केला म्हणून दिली जीवे मारण्याची सुपारी; 4 जण ताब्यात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रेमात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या भावाला सुपारी देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले आहे. पकडलेल्या आरोपींकडून एक गावठी कट्टा आणि जिवंत गोळी तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि माणगाव पोलिसांनी सीसीटीव्ही आणि सिडिआरच्या सहाय्याने हा गुन्हा उघडकीस आणला असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माणगाव येथील मेडिकल दुकानदार शुभम जयस्वाल यांच्यावर 11 फेब्रुवारी रोजी दोन अज्ञात इसमानी मोटार सायकलवर येऊन गोळी झाडली होती. शुभम याच्या उजव्या बाजूस पोटात गोळी घुसली होती. या प्रकारानंतर रात्र गस्तीला असलेल्या पोलीस पथकाने तातडीने जखमी शुभमला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर शुभम याला पुढील उपचारासाठी मुंबई सैफी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे शुभम याचा जीव वाचला. गोळीबार घटनेचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यानी पथक तयार केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सीसीटीव्ही आणि सीडी आर च्या माध्यमातून तपास सुरू केला. दरम्यान शुभम याच्या वडिलांच्या फोनवर आरोपी यांनी दोन दिवसात दोन करोडची खंडणी मागून पैसे दे अन्यथा तुझ्या परिवारासह मुलाला ठार मारू अशी धमकी दिली. धमकीचा आलेल्या फोन नंबरवर सायबर शाखेच्या माध्यमातून तपास केला असता आरोपीचा मागोवा लागला. मुख्य आरोपी मयूर गवळीसह (21), अजय अवचार (20), राजेश शेळके (22), नितीन कांबळे (24) या चार जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

मुख्य आरोपी मयूर गवळी याचे शुभम याच्या बहिणीशी इन्स्ट्राग्राम वर मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ही बाब शुभमला कळल्यानंतर त्याने बहिणीचा मोबाईल काढून घेतला होता. त्यामुळे मयूर याला प्रेयसीशी संपर्क होत नव्हता. हा राग मनात ठेवून मयूर याने आपले मित्र असलेल्या चार जणांना शुभम याला जीवे ठार मारण्यासाठी 80 हजाराची सुपारी दिली होती. या गुन्ह्याबाबत माणगाव आणि वाशी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर सह तीन जण अटक असून अजून एक जण फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
स्थानिक गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय डोंबाळे, उपनिरीक्षक महेश कदम, सहा फोज गिरी, पोह दीपक मोरे, सुधीर मोरे, अमोल हबीर, प्रतीक सावंत, जितेंद्र चव्हाण, पोना ईश्‍वर लांबोटे, पोकॉ अक्षय सावंत, चालक देवराम कोरम, सायबर सेल पोना अक्षय पाटील, तुषार घरत या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली. गुन्ह्याचा पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.

Exit mobile version