गांजाची विक्री करणार्‍या व्यक्तीस अटक

1200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त


। पनवेल । वार्ताहर ।

उरण फाटा येथे गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. राजु बाबु धोत्रे (46) असे या व्यक्तिचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला 1200 ग्रॅम वजनाचा 18 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे.

सायन पनवेल मार्गालगत उरण फाटा येथे एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सीबीडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे व त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री उरण फाटा येथील टी-पाँईटजवळ सापळा लावला होता. सदर ठिकाणी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास राजु बाबु धोत्रे हा सॅक बॅग घेऊन संशयास्पदरित्या आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या जवळ असलेल्या बॅगची झडती घेतली असता, त्यात 18 हजार रुपये किंमतीचा 1200 ग्रॅम वजनाचा पाने, फुले, काडया, बिया असलेला उग्र वासाचा गांजा आढळुन आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे गांजाबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने सदरचा गांजा विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरोधात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याजवळ असलेला गांजा जप्त केला आहे.

Exit mobile version