रामेश्‍वरच्या पुष्करणीत पाणकावळ्याचे आगमन

। रेवदंडा । वार्ताहर ।
ऐन पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या चौल रामेश्‍वर पुष्करणीत दुर्मिळ पाणकावळ्याचे आगमन झाले असून, त्यांचे पाण्यावर पोहणे व मासेमारीसाठी पाण्यात खोलवर डुबकी मारण्याचे मनमोहक चित्र सध्या पहायला मिळत आहे. गेले काही दिवस हे कावळे याठिकाणी यथेच्छ मासेमारी करताना दिसून येत आहेत.

चकचकीत काळसर वर्णाचा, काळ्या पिसावर हिरवट निळसर झाक, निमुळती, चपटी व टोकाशी किंचीत बाकदार पिवळसर काळी चोच, लांबलचक सडपातळ मान, गळ्यावर पाढुंरका ठिपका, लांब व कडक शेपटी, नर-मादी दिसायला सारखे असे त्याचे वर्णन करता येईल. कावळ्यासारखा दिसतो म्हणून त्याला पाणकावळा म्हटले जाते. त्यास कारा, कोकोक, करढोल, कामरा अशा विविध नावांनी ओळखले जाते.

पुष्करणीत दिसणारे हे पाणकावळे नजीकच्या नारळाच्या झाडांच्या झापांवर सुपासारखे पंख पसरवून पंख सुकवितात. या पाण पाखराच्या कमरेशी असलेल्या तेलग्रंथीच्या अभावाने त्यांना थोड्या-थोड्या वेळाने पंख सुकविण्यासाठी पाण्याबाहेर यावे लागते. पंखातील पाण्याचा भार हलका झाल्यावर मस्त हवेत झोकून देऊन सलग पाण्याला समातंर हातभर उडताना पाहण्याची सार्‍यांनाच आगळीकता वाटते. भक्ष्य हेरताच तो त्याची लवचिक, लांब मान ताणून पाण्यात डुबी मारून मासे पकडतो. हा पाणकावळा एक कुशल पाणबुड्या म्हणून पक्षीजगतात ओळखला जातो.

Exit mobile version