| पनवेल | प्रतिनिधी |
श्री साई सेवा मंडळ ओवळेतर्फे दरवर्षीप्रमाणे साईभक्तांची ओवळे-पनवेल ते शिर्डी पदयात्रा उत्साहात सुरु झाली. या पालखी दिंडीचे आगमन तालुक्यातील खिडूकपाडा गावात झाले. कार्यक्रमाची सुरुवात रथ पूजनाने करण्यात आली. यावेळी आण्णा भोईर, सुरेश भोईर यांनी रथ पूजन तसेच पालखी पूजन केले. या पालखी सोहळ्याचे स्वागत ठिकठिकाणी झाले. खिडूकपाडा येथील साई मंदिराची स्थापना सन 2010 साली झाली तेव्हापासून ओवळे येथून निघणाऱ्या साईंच्या पदयात्रेचे याठिकाणी आगमन होत असून याठिकाणी ग्रामस्थांच्यावतीने साईंची सेवा करण्याचे भाग्य दिल्याबद्दल मंडळाचे आभारी असल्याचे मत यावेळी खिडूकपाडा साई मंदिराचे प्रभुदास उर्फ आण्णा भोईर यांनी व्यक्त केले. यावेळी पालखी निघताना अनेक साईभक्त बंधू-भगिनींनी पदयात्रेत सामील होऊन प्रेमळ निरोप दिला. ओम साई रामच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.







