हायवा गाड्या आणि जेसीबी जप्त
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात काही महिन्यांपूर्वी रुजू झालेले तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी तालुक्यातून तस्करी होत असलेल्या लाल मातीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. सोमवारी सर्व कर्जत तालुका झोपी गेलेला असताना मध्यरात्री साडेअकरा ते चार या वेळेत लाल मातीची तस्करी करणाऱ्या हायवा ट्रकवर धाडी टाकून ताब्यात घेतले. दरम्यान, लाल मातीने भरलेल्या तीन गाड्या या पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या. अन्य तीन गाड्यांच्या टायरमधील हवा काढण्यात आली आणि सहा रिकाम्या गाड्यांवर कारवाई केली. तहसीलदारांच्या कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, तालुक्याच्या जंगल भागातून गेले वर्षभर सुरू असलेल्या लाल मातीच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.
निसर्ग संपदा लाभलेल्या कर्जत तालुक्याला येथील वनराई, जंगल आणि लाल माती यामुळे प्रदूषणमुक्त तालुका म्हणून बिरूद प्राप्त झाले आहे. याच तालुक्यातील लाल मातीवर मुंबईकरांचे डोळे लागले आणि येथील लाल माती रात्रीच्या अंधारात मुंबईकडे रवाना होऊ लागली. मागील वर्षभरापासून दररोज कर्जत तालुक्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातून लाल माती भरून जाणारे ट्रक येथील जनता उघड्या डोळ्याने पाहात आहे. हा सर्व खेळ रात्री दहापासून पहाटेपर्यंत सुरू असल्याने रात्रीच्या अंधारात आपल्याला काही नुकसान होऊ नये म्हणून धावणाऱ्या ट्रकपुढे कोणी येत नव्हता आणि लाल माती घेऊन जाणाऱ्या ट्रकबद्दलदेखील कोणी बोलत नव्हते. मात्र, समाज माध्यमांवर कर्जत तालुक्यातील नांदगाव, खांडस आणि ओलमन भागातून असे लाल माती घेऊन जाणारे ट्रक दररोज जात असल्याच्या चर्चा दिसून येत होत्या. त्यावेळी कोणी तक्रार केली तर महसूल विभागाचे तलाठी थातुरमाथूर कारवाई करीत होते. मात्र, एकदाही लाल माती घेऊन जाणारा ट्रक प्रशासनाने पकडला नव्हता.
राजकीय वरदहस्त असल्याने कर्जत तालुक्यातून दररोज दहा ते चाळीस हायवा ट्रक गाड्या लाल माती घेऊन मुंबईकडे जात असल्याचे आढळून आले होते. त्यात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने मोठा राजकीय आशीर्वाद या माती काढणाऱ्या लोकांच्या पाठीशी असल्याचा भास होत होता. तक्रारी करूनदेखील एकही ट्रक पोलीस किंवा महसूल प्रशासनाला सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. मात्र, सोमवारी रात्री अकरा वाजता कर्जत येथून तहसीलदार जाधव यांनी मंडळ अधिकारी बाबासो शेटे, तलाठी निलेश पवार, दत्ता ठोकळ यांच्यासोबत वेगवेगळे ग्रुप करून लाल मातीची तस्करी होत असलेल्या भागात सर्च मोहीम सुरू केली. दरम्यान, कशेळे खांडस रस्त्यावर तीन हायवा गाड्यांना लाल मातीची वाहतूक करीत असताना पकडले आणि कशेले येथे पोलिस चौकीत ते ट्रक आणून दररोज होणारी तस्करी उधळवून लावली. अशा 12 गाड्या लाल माती तस्करी करीत असताना आढळून आल्या आहेत.
कारवाईचे कौतुक
या कारवाईबद्दल तहसीलदार डॉ. धनंजय जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यात पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यासदेखील यामुळे मदत होणार असून, भविष्यात कर्जत तालुक्यातून लाल मातीची तस्करी रोखण्यात तहसीलदार कार्यालय यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.