| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील जेष्ठ पत्रकार रायगड भूषण पुरस्कार प्राप्त अरुण तुकाराम पवार यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्व.माजी आ. मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ रायगड, अॅड. उमेश ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्काराचा कार्यक्रम शनिवारी (दि.3) सायंकाळी सातिर्जे, ता.अलिबाग या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. अरुण पवार हे गेली 40 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी रायगड जिल्ह्यातील तसेच माणगाव तालुक्यातील विविध प्रश्न, समस्यावर आवाज उठून आपल्या धारदार अशा अभयसंपुर्ण व निर्भीड लेखणीने अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात पवार यांचे उल्लेखनीय असे काम आहे. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी पवार यांना अनेक तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्य करीत असताना रक्तदान शिबीर कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असतात. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन ते वेळोवेळी करीत असतात. अरुण पवार यांच्या या सेवाभावी कार्याची दखल उपरोक्त संघटनेने घेऊन त्यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.







