मराठी शाळेच्या नूतनीकरणासाठी आर्थिक मदत
| तळा | प्रतिनिधी |
तळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी (दगडी शाळा) शाळेच्या नूतनीकरणासाठी समाजसेविका अरुणा बापट यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे. अरुणा बापट या माजी शिक्षिका असून, सध्या समाजसेविका म्हणून त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते.
तळे मराठी (दगडी शाळा) ही जवळपास एकशे चौसष्ट वर्षे जुनी शाळा असून, या शाळेचा इतिहास पाहता भारताचे पहिले अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांनी याच शाळेत आपले प्राथमिक शिक्षण घेतले आहे. तसेच तालुक्यातील अनेक यशस्वी उद्योजक, राजकारणी, व्यापारी व अधिकारी यांनी याच शाळेतून शिक्षण घेऊन आपले जीवनमान उंचावले आहे. या शाळेचे नूतनीकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्याकडे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांकडून करण्यात आली होती. या शाळेचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन कृष्णा महाडिक यांनी आपल्या प्रयत्नातून माजी शिक्षिका व समाजसेविका अरुणा बापट यांच्याकडे प्रस्ताव मांडला असता त्याला लगेच मंजुरी देत अरुणा बापट यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी पाच लाखांचा निधी मंजूर केला. त्याचा धनादेश कृष्णा महाडिक यांनी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या हस्ते सुपूर्द केला. याप्रसंगी शिक्षक सुनील बैकर, मित्तल वावेकर, संदीप कांबळेकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा वेदिका गोरीवले यांसह पालक उपस्थित होते.







