शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महायुतीतः बच्चू कडू

| अमरावती | वृत्तसंस्था |

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार बच्चू कडू यांची गुरुवारी भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, महाविकास आघाडीत जाण्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महायुतीमधून कोठेही जाणार नाही, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

बच्चू कडूंनी शरद पवारांना चहाचे निमंत्रण दिल्यानंतर शरद पवार हे कडू यांच्या निवासस्थानी गेले होते. आमच्या भेटीचे काहीही संकेत नाहीत. शरद पवार यांनी आमंत्रण स्वीकारले हेच महत्त्वाचे आहे. ते देशाचे नेते आहेत. आमच्यामध्ये काही राजकीय चर्चा झाली असली, तरी ती उघड करणे गरजेचे नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढे तारतम्य ठेवले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले. आमच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती सारखीच आहे. आमचे मुद्दे त्यांना पटल्याने आम्ही एकनाथ शिंदेंसोबत गेलो. दिव्यांग मंत्रालय दिले म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आहोत. आमचे मुद्दे, विचार महाविकास आघाडीला पटले तर त्यांच्या सोबतही जाऊ. आमचा प्रस्ताव महाविकास आघाडी आणि महायुतीलादेखील देऊ, असे कडू यांनी स्पष्ट केले.

या भेटीमध्ये थोडी राजकीय, सामाजिक आणि शेतीच्या संदर्भात चर्चा झाली. जास्त प्रमाणात शेती विषयावर चर्चा झाल्याचे कडूंनी स्पष्ट केले. अमरावतीमध्ये किती मतदारसंघ आहेत. यांची माहिती पवारांनी घेतली. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएसमध्ये घेतली गेली पाहिजे आणि हा विषय तुमच्या अजेंड्यावर घ्या, अशी मागणी कडू यांनी पवार यांच्याकडे केल्याचे सांगितले. मदतीची जाणीव म्हणून त्यांना आम्ही भेटीला बोलावलं.

अचलपूरमधील फिनले मिलमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे, आमचा राजकीय पक्ष आहे. आम्ही काही समाजसेवी संस्था नाही. आमची जर राजकीय मजबूती वाटत असेल तर कुठला पक्ष नाकारणार आहे? जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत आम्ही सोबत आहोत, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version