। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात झाल्याबरोबर काही वेळातच महावितरणची वीज गायब होत असल्याचे चित्र आहे. खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत होण्यास पाच ते सहा तासांचा कालावधी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेक वेळा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणचे अभियंता फोन उचलण्यास टाळाटाळ करतात. जरी फोन उचलला तरी काम चालू आहे थोड्या वेळात वीज पुरवठा सुरळीत होईल असे उत्तर देतात. मात्र, प्रत्यक्ष पहाटेच्या वेळी वीज गेल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतेही महावितरणचे अभियंता किंवा कर्मचारी दिवस उजाडल्याशिवाय त्या ठिकाणी जात नसल्याने नागरिकांना सहा ते आठ तास अंधारामध्ये राहावे लागत आहे. अद्याप पावसाळा सुरू झाला असला तरी सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस पडत नसल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महावितरण कडून पावसाळ्याअगोदरची कामे करण्यासाठी अनेक वेळा संपूर्ण दिवसभर वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. यामध्ये लाईनच्या बाजूला असलेल्या झाडांची कटिंग, त्याचप्रमाणे पावसाळ्या अगोदर करण्यात येणार्या दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा खंडित केला जातो.
एवढी सगळी कामे महिन्यातून चार वेळा दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवून करून सुद्धा पावसाला सुरुवात झाल्यानंतर वीज पुरवठा का खंडित होतो? याचे उत्तर महावितरणचे अभियंता देऊ शकत नाहीत. सहा ते आठ तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक मोबाईल कंपन्यांची मोबाईल सेवा देखील खंडित होत असते. त्यामुळे व्यावसायिकांचे, नागरिकांचे विविध कामासाठी नेटवर्क नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. महावितरण नागरिकांकडून बिल वसूल करताना स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, विज विक्रीकर, व्याज, निव्वळ थकबाकी, समायोजित रक्कम, व्याजाची थकबाकी, एकूण थकबाकी इत्यादी प्रकार ग्राहकांकडून वसूल करत असतात. त्याशिवाय शंभर युनिट यावरती वेगवेगळे विजेचे दर लावले जातात. वीज ग्राहकांकडून एवढ्या मोठ्या रकमेची लूट करून सुद्धा ग्राहकांना योग्य प्रकारे वीज पुरवठा करण्यामध्ये महावितरण पूर्णपणे अकार्यक्षम ठरत आहे.