| मुंबई | वृत्तसंस्था |
देशभरासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कामाला लागली आहे. त्यातच कोरोनाच्या जेएन 1 या नव्या व्हेरियंटचेही रुग्ण आढळायला लागलेत. ठाण्यात नव्या व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय पुण्यातही जेएन1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यात नव्याने 50 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सोबतच, जेएन 1 व्हेरीयंटच्या रुग्णांची संख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. राज्यातली कोरोना बाधितांची रुग्णसंख्या 153 वर जाऊन पोहोचली आहे. 20 डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात जेएन 1 व्हेरीयंटच्या रुग्णाची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 24 डिसेंबर रोजी 9 जेएन1 व्हेरीयंटच्या रुग्णांची राज्यात नोंद झाल्याचे सांगितले. ठाणे पालिका हद्दीत 5, पुणे पालिका हद्दीत 2, तर पुणे ग्रामीण, अकोला पालिका हद्द आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे हे सर्वच दहाही रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.